My Blog List

Wednesday, August 9, 2023

ना. धो. महानोर

श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड 
मराठी विभाग आयोजित
रानकवी ना. धो. महानोर यांना आदरांजली व रानातल्या कवितांचे वाचन
 
सोमवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२३
    
   श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड मराठी विभाग आयोजित रानकवी ना. धो. महानोर यांना आदरांजली वहण्याच्या निमित्ताने 'रानातल्या कविता' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठी साहित्यातील प्रसिद्ध ग्रामीण रानकवी ना. धो. महानोर यांचे गुरुवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
    मराठी ग्रामीण साहित्यात ना. धो. महानोर यांच्या कवितांचा प्रभाव उल्लेखनीय आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात बी. ए. II मध्ये अभ्यासपत्रिका क्रमांक IV साठी ना. धो. महानोर यांच्या 'पक्षांचे लक्ष थवे'' यामधील निवडक गीतात्मक कवितांचा समावेश अभ्यासक्रमात केलेला आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना त्यांच्या कवितेची अभिरुची विकसित व्हावी व 'रानातल्या कविता' या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांना आदरांजली व त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करावे या उद्देशाने सकाळी १०.४५ ते दुपारी २.३० या वेळेत कार्यक्रम संपन्न झाला.
     कार्यक्रमाच्या प्रारंभी 'रानातल्या कविता' या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांच्या हस्ते ना. धो. महानोर यांच्या पुस्तकांना हार व पुष्प अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. रघुनाथ मुडळे यांनी केले. प्रास्ताविकाच्या अनुषंगाने ना. धो. महानोर यांच्या कविते संदर्भातील सद्य परिस्थिती स्पष्ट करून ना. धो. महानोर यांच्या स्मृतींना अभिवादन करणे हे मराठी विभागाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपण सर्वजण जमलात असे वक्तव्य करून या निमित्ताने शब्दसुमनांनी स्वागत केले. प्रास्ताविकेनंतर बहुउद्देशीय सभागृहातील विचारपीठ व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून महानोर यांच्या प्रति शोकात्मक स्वरूपात आदरांजली वाहण्यात आली.
    यानंतर कवीवर्य ना. धो. महानोर यांच्या कवितांचे काव्यवाचन विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील साधारण २५० विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये महाविद्यालयातील कु. प्रतीक्षा रमेश घोलप हिने 'आम्ही ठाकर ठाकर ठाकर', कु. सानिका दीपक पाटील 'भरलं आभाळ', मयुरी दिलीप पाटील 'झिम पोरी झिम..', सानिका संजय पवार 'पाणी पाणी पाणी…', रसिका सुतार 'आईचा जन्म', ईश्वरी पाटील 'चिंब पावसानं..', गणेश चव्हाण 'मी अमृताचे कुंभ प्यालो..', आम्रपाली घोलप 'शेतकऱ्याचं गाणं..', साक्षी बाबाराम हरगुडे 'मी असा एक कल्ली…' अशा अनेक कविता वाचनांनी सभागृहातील रसिकांची वाहवा मिळवली. 
    यानंतर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्रा. के. एन. पाटील, डॉ. के. ए. पाटील यांनी महानोर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. शिवाय त्यांच्या कवितांचे काव्य वाचन केले. प्रमुख मनोगत प्रा. सौ. एस. एन. खरात यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी मराठी काव्याची पार्श्वभूमी सांगून विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट व बहिणाबाई चौधरी या परंपरेशी महानोर यांच्या कवितेचा गेयतेच्या अनुषंगाने आलेला सहसंबंध स्पष्ट केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतांमध्ये निव्वळ कविता वाचून मोकळे होण्यापेक्षा कवितेचा अर्थ आशय व तपशिलासह कविता अनुभवण्याचा प्रयत्न करा व भाषिक विचारांची प्रगल्भता जपा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ना. धो. महानोर यांची 'या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे' या कवितेचे काव्य वाचन केले. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एल. टी. आरगे यांनी महानोर यांच्या कवितेचे गायन केले.
    अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांनी 'कविता आणि मानवी जीवन यातील परस्पर संबंध स्पष्ट करून कवितेचा आस्वाद विज्ञान शाखेच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही वेळोवेळी करून घ्यावा असे आवाहन करून महाविद्यालयात राबविला जाणारा 'कवितेचा कट्टा' यासारखे उपक्रम कवी घडवण्यास नेहमीच मार्गदर्शक ठरतील.' असे प्रतिपादन केले. याशिवाय उपस्थित कवी प्रेमी यांना महानोर यांच्या निवडक मराठी चित्रपटातील गीतांचे पडद्यावर सादरीकरण करण्यात आले.
    
    या कार्यक्रमास प्रा. डॉ. नवनाथ गायकवाड, प्रा. राज गायकवाड, प्रा. आनंदा पाटील, प्राध्यापिका ज्योती हरगुडे, प्रा. डॉ. ए. ए. अत्तार, प्रा. डॉ. एस. एस. बनसोडे, प्रा. डॉ. पी. टी. वाघमारे, प्रा. दत्तात्रेय नलगे, प्रा. पी. ए. चरणकर, प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. एस. बी. शिनगारे, प्रा. सुनील घोलप, प्राध्यापिका ऐश्वर्या पाटील, प्राध्यापिका प्रतिभा पाटील, प्राध्यापिका वासंती जाधव, प्राध्यापिका सोनाली पाटील, प्राध्यापिका उज्वला पाटील, प्राध्यापिका पूनम सावंत, प्राध्यापिका शाहीन शेखसुतार, प्राध्यापिका मेघा राणी पाटील इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते. 
    विज्ञान विभागातील प्राध्यापिका ऐश्वर्या पाटील यांनी काव्य गायन केले. प्रा. प्रकाश नाईक यांनी महानोर यांच्या चित्रपट गीतांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. डॉ. एल. के. बोराटे यांनी 'घन ओथंबून येती' या कवितेचे गायन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश नाईक यांनी केले. आभार प्रा. डॉ. एल. के. बोराटे यांनी मानले.








Tuesday, August 1, 2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती

         श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड 
        मराठी विभाग
         "अण्णाभाऊ साठे यांची जयंती" 

  श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड येथे 'मराठी विभाग' आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवार दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
  महाविद्यालयातील मल्टीपर्पज हॉलमध्ये सकाळी ठीक ११.०० वाजता 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व मराठी साहित्य' या विषयावर मराठी विभागातील प्रा. डॉ. एल. के. बोराटे यांनी अण्णाभाऊ साठे यांची व त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली. मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊंचे असणारे योगदान आणि त्यामुळे भक्कम झालेली दलित साहित्याची चळवळ अधोरेखित केली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. एल. के. बोराटे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विषयी विद्यार्थ्यांना माहीत नसणाऱ्या काही गोष्टी मांडल्या यामध्ये अण्णाभाऊंचे शिक्षण अवघ्या दीड दिवसाचे होते; तरीही त्यांनी मराठी साहित्यामध्ये अजरामर अशी साहित्य संपदा निर्माण केली. तमाशाला लोककला प्रकार त्यांनी मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान होते. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. धारवाड, बेळगाव, निपाणी या प्रदेशासारखी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये. असा त्यांचा प्रयत्न होता. त्यावेळी त्यांनी 
           "माझी मैना गावाकडे राहिली! 
          माझ्या जीवाची होतीया काहीली!!" 
ही छक्कड म्हटली होती. अशा अनेक उदाहरणांनी प्रा. डॉ. एल. के. बोराटे यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींचा उजाळा करून दिला.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. दिनकर नांगरे हे होते. अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीचा सखोल अभ्यास त्यांच्या भाषणातून दिसून आला. मुंबईमध्ये रंगकाम करताना अण्णाभाऊंचा मराठी वाचनाशी संबंध आला. तसेच अण्णाभाऊ यांच्या 'फकीरा'या कादंबरीतील नायकाची समाजाविषयी असणारी तळमळ कशी व्यक्त झाली आहे. याची थोडक्यात माहिती दिली. अण्णाभाऊंच्या गतस्मृतींना उजाळा देण्याचे काम अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात केले. 
   अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे हे होते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. पी. बी. पाटील, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुगत बनसोडे, भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश वाघमारे, ग्रंथपाल श्री. अशोक पाटील, कॉमर्स विभागाचे प्रमुख प्रा. लक्ष्मण आरगे व सहयोगी प्राध्यापक उपस्थित होते. 
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. कृष्णात पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सौ. सुलोचना मोहिते यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार मराठी विभागाचे प्रा. रघुनाथ मुडळे यांनी मानले. सदर जयंतीच्या कार्यक्रमास महाविद्यालयातील बी. ए., बी. कॉम. व बी. एससी. मधील ७०-७५ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. अशा तऱ्हेने महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.

Friday, July 21, 2023

फेर परीक्षा सूचना

श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड मधील बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. भाग II च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत झालेल्या मार्च/एप्रिल २०२३ च्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते; परंतु काही कारणास्तव परीक्षा देता आली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तरी अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेस उपस्थित राहावे. 
     सोबत परीक्षेचे वेळापत्रक जोडले आहे. 

Thursday, July 20, 2023

News

 विद्यार्थी सूचना 

  श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरुड मधील प्रवेशित बी. ए. भाग - I,II,III व बी. कॉम. भाग - I  सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपल्या सर्व विषयांचे अध्यापन सुरू झाले असून आपण महाविद्यालयातील तासिकांना नियमित उपस्थित राहावे. मराठी विभागातील विद्यार्थ्यांच्या तासिकांचे वेळापत्रक सदरच्या blogger वर प्रकाशित करण्यात आले आहे. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.


मराठी विभाग